पंचगंगेतून पाणी पुरवठ्याबाबत आज महापालिका घेणार निर्णय

इचलकरंजीत पाण्याचा प्रश्न दिवसेदिवस गंभीर बनत चालला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. येथील पंचगंगा नदी पात्रातील पाणी प्रवाहित झाले आहे. मात्र, अद्याप पाणी दूषित असल्यामुळे महापालिकेने उपसा सुरू केलेला नाही. आज रविवारी पाण्याचे नमुने तपासल्यानंतरच पाणी उपसा करण्याचा निर्णय घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पंचगंगा नदी पात्र कोरडे पडले होते, तर बंधाऱ्यात साचलेले पाणी दूषित झाल्यामुळे मासे मृत्युमुखी पडले होते. खबरदारी म्हणून महापालिकेने गेल्या सात दिवसांपूर्वीच पंचगंगा नदीतून उपसा बंद केला होता. दोन दिवसांपूर्वी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे पंचगंगा नदी प्रवाहित झाली आहे. मात्र अद्यापही नदी पात्रात दूषित पाणी असून, दुर्गंधी येत आहे.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पाणी तपासणी केल्यानंतरच उपसा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पंचगंगा नदीतून दररोज नऊ एमएलडी इतके पाणी उपसा केले जाते. सध्या पंचगंगा नदीतील पाणी उपसा बंद असल्यामुळे शहरात दोन-तीन दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या केवळ कृष्णा योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहरात काहीअंशी पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरच शहरातील पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे.