सध्या इचलकरंजी शहरात पाण्याचा प्रश्न तर आहेच याचबरोबर वाहतूक रस्ते यामध्ये देखील अनेक समस्या आहेत. उद्योगनगरी म्हणून परिचित असलेल्या शहरामध्ये अनेक औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, वसाहतीमध्ये सुविधांची वानवा आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अशा रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच कलानगर ते चंदूर रस्ता, गावभाग परिसरातील लहान मोठे रस्ते, सुंदर बाग परिसर, रिंग रोड, गणेनगर, जवाहरनगर, सांगली रस्ता, व्यंकटराव परिसर, स्टेशन रोड परिसरातील रस्ते आदी भागातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान- मोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यांवर लहान-मोठ्या चरी पडल्याने या रस्त्यावरून वाहन चालवताना छोटे-मोठे अपघात घडत आहेत. तसेच वारंवार खड्डयातून गेल्यामुळे अनेकांना अंगदुखी, हाडांचे व्याधी जडत आहेत. तेव्हा तातडीने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यांसह इतर अनेक लहान-मोठ्या रस्त्यांची मोठी वाताहत झाली आहे. अनेक रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे, चरी पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. सातत्याने या खराब रस्त्यांवरून वाहने चालविल्याने हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत. तेव्हा नव्याने रूजू झालेल्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी खराब रस्त्यांबाबत हालचाल करून डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महानगरपालिकेच्यावतीने शहरातील मुख्य रसत्यांच्या डांबरीकरणासाठी दीड कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्त्याचे डांबरीकरण सुरू करावे, यासाठी आयुक्त पल्लवी पाटील यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. बांधकाम विभागाची अनेक कामे प्रलंबितच नगरोत्थान महाभियानांतर्गत शहरातील लहान-मोठ्या अशा एकूण ९१ रस्त्यांचे बळकटीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी तसेच इतर कामासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदरची कामे ही शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. मात्र, त्यातील अनेक कामे अद्याप सुरूच झाली नाहीत. त्यामुळे ही कामे सार्वजनिक बांधकामाऐवजी महानगरपालिका प्रशासनाने करावीत, अशी मागणी होत आहे.