सांगलीत पावसाचा मारा! ऊसशेती भुईसपाट…..

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंड होण्यापूर्वीच पावसामुळे विझल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राजकीय नेत्यांनी (Election) आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भरपावसातही वातावरण तापतं ठेऊन सांगता सभा गाजल्या.

राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार (Rain) पावसाने हेजरी लावली. त्यामध्ये, पुणे, सातारा, सांगली (Sangli), बेळगाव, मिरज, बीड, सोलापूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकटाडही ऐकायला मिळाला.

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजांच्या ताराही तुटल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील मिरजेत सोसाट्याच्या वाऱ्यासह सायंकाळी चारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळी पावसाने मिरज शहरातील रस्त्यावरील झाडे मुळासकट उखडून आणि झाडांच्या फांद्या पडून अनेक ठिकाणी गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

वीज तारा जागोजागी तुटल्याने शहरातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्या कटींग करणारे मशीन आणून रिक्षा बाहेर काढल्या. येथील तीन रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे.