तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान ७ मे रोजी पार पडले. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील कुमार विद्यामंदिर या मतदान केंद्रावर मतदान असलेल्या सुमारे ५० हून अधिक नागरिकांची नावे मतदार यादीमधून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या नागरिकांना मतदानाचा हक्क बाजवता आला नाही.
यावेळी संतापलेल्या नागरिकांनी केंद्रावरच ठिय्या आंदोलनाचा मार्ग पत्करला होता. केंद्रावर वातावरण तणावपूर्ण होत असल्याने उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
लोकसभा निवडणुकीवेळी कोरोची येथील ५० हून अधिक नागरिकांना मतदार यादीमधील नावे गहाळ केल्यामुळे मतदानाच्या मूलभूत हक्कास मुकावे लागले होते.यावेळी नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, दुसऱ्याच दिवशी तुम्हाला मतदान करता येत नसल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधील नावे गहाळ झालेल्या मतदारांना एकत्रित आणून न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. त्यासंदर्भात वकिलांशी चर्चा झाली असून, लवकरच याचिका दाखल करणार असल्याचे युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले यांनी सांगितले.
