नागाव येथील सागर सुधाकर समुद्रे (वय ३७ ) याला बेदम मारहाण करण्यात आली.याप्रकरणी वैभव माजगावकर, धनाजी गुरव ( दोघेही रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले ) व अभिजित शिंदे ( रा. संभाजीनगर, नागाव) यांच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी, अशी मागणी सागरच्या पत्नीने केली आहे. संशयितांवर महाराष्ट सावकारी (निगमन)अधिनियम २०१४ नुसार कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सागर समुद्रे हा नागाव ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. दोन महिन्यांपूर्वी त्याने औषधोपचारासाठी वैभव माजगावकर याच्याकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यावेळी सागरने कोरा धनादेश वैभवकडे दिला होता. या प्रकरणात अभिजित शिंदे हा मध्यस्थी होता. वैभवने सागर व अभिजितकडे पैशासाठी तगादा लावला. त्यामुळे बुधवारी अभिजितने सागरला नागाव फाटा येथे बोलावून घेतले. त्यानंतर अभिजित सागरला एका बीअरबारमध्ये घेऊन गेला. वैभव सावंत व धनाजी गुरव हे दोघे त्या बारमध्ये होते.
बारमध्ये सर्वांनी मिळून मद्यप्राशन केले. त्यावेळी पैशाचा विषय निघाला असता सागरने त्यांना पाच हजार रुपये दिले. उर्वरित व्याजाची रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले. पण, वैभव, धनाजी व अभिजितने उर्वरित पैसे आताच पाहिजेत, असा तगादा धरला. पण, पैसे मिळत नाहीत म्हणून सागर यास नग्न करून बेदम मारहाण केली. थोड्या वेळाने सागरच्या पत्नीचा फोन आला. तिलाही त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.