विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला जवळपास फायनल झाला आहे. पण महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबतची चर्चा गुरूवारपर्यंत सुरूच होती.अखेर त्यांचा देखील जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे. महाविकास आघाडीमध्ये १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फायनल फॉर्म्युला ठरला आहे.
आतापर्यंत २८८ जागांपैकी २६० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. यामधील १०० जागा काँग्रेस पक्षाला तर उद्धव ठाकरे गटाला ८० आणि शरद पवार गटाला ८० जागा देण्यावर आघाडीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केला आहे.महाविकास आघाडीने उर्वरीत २८ जागा या मित्र पक्षांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २८ जागांवर दोन पक्षांनी दावा केला आहे. हा २८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागांवर सध्या महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे.
येत्या दोन दिवसांत हा तिढा देखील सुटेल आणि जागा वाटपाचा निर्णय जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. येत्या रविवारी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय जाहीर केला जाईल.