मागेल त्याला शेततळे योजनेस उस्फुर्त प्रतिसाद!

सांगली जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. गत आर्थिक वर्षात १२३७ शेततळी पूर्ण झाली. जिल्ह्यातील १ हजार २८० शेतकऱ्यांना यासाठी ७ कोटी ८३ लाख ५१ हजारांचे अनुदान वाटप झाले आहे.१०६ शेततळ्यांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्हा कृषी विभागाने मागेल त्याला शेततळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हाभर प्रचार आणि प्रसिद्धी केली आहे. ही योजना प्रभावीपणे राबवली आहे. त्यामुळे गत आर्थिक वर्षात या योजनेतून १ हजार २८० शेतकऱ्यांनी १२३७ शेततळी पूर्ण केली आहेत. जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, खानापूर आणि जत तालुक्यातील शेतकरी शेततळी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

त्यामुळे दुष्काळी भागात शेततळी शेतकऱ्यांना वरदान ठरत आहेत. जास्तीत जास्त ३० बाय ३० बाय ३ मीटर व कमीत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर आकारमानाचे यंत्राच्या साह्याने शेततळ्यांची खोदाई करून घोटणी केली जाते. पाण्याचा अपव्यय होऊ नये म्हणून अस्तरीकरणासाठी चांगल्या दर्जाचा प्लॅस्टिक कागद वापरला जातो.