अलीकडच्या काळात अपघातांच्या प्रमाणात भरपूर वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशा अपघातामध्ये अनेकांचे प्राण देखील गेलेले आपण जाणतच आहात. असाच एक अपघात पुणे सोलापूर महामार्गावर झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील (Pune Solapur Highway) खंडाळी इथं लक्झरी बस व ट्रकच्या झालेल्या अपघातात (Bus-Truck Accident) एक प्रवासी ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.
पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एमएच १२ एसपी ५२७२ या मालवाहतूक ट्रकला मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या एमपी ०९ डीएल ८०९१ या खासगी लक्झरी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये खासगी बसच्या केबिनचा चक्काचूर झाला. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी प्रवास करीत होते. प्रवासी झोपेत असल्याने जोरदार धक्क्यामुळे अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघातातील मृत व जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघातस्थळी वरवडे व सावळेश्वर येथील टोलनाक्याच्या महामार्ग गस्ती पथकामधील डॉ. गोरखनाथ लोंढे, इरेश कस्सा, पवन फाटे, रोहित काकडे यांनी रुग्णवाहिकेतून जखमींना सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
महामार्ग पोलीस केंद्र मोडनिंब व मोहोळ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यास मदत केली. पहाटे झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर जवळपास चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.