Solapur News : तब्बल चार मतदारसंघांवर पंढरपूरचा प्रभाव

पंढरपूर तालुक्याचा मोहोळ, माढा, सांगोला व पंढरपूर या चार विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांत उमेदवारी देताना महाविकास आघाडी आणि महायुतीला देताना निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी लागणार आहे. कारण पंढरपूर तालुक्याचा प्रभाव हा चार विधानसभा मतदारसंघांवर पडणार आहे. त्यामुळे पंढरपूर आपल्या हातात ठेवण्यासाठी नेतेमंडळींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

यातच अकलूजच्या मोहिते-पाटील यांचे या मतदारसंघावर वर्चस्व असल्यामुळे महाविकास आघाडी प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देऊन आपली पकड अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शरद पवार यांनी प्रशांत परिचारक यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिल्याची चर्चा आहे. पंढरपूर तालुक्यातील १५ गावे सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. या सांगोला विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आ. शहाजी पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला आहे.

तो शाबुत ठेवण्यासाठी स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू शरद पवार यांच्या मध्यस्थीने प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीतून सांगोलाची जागा ही शेकापला दिली जाणार आहे. त्यामुळे सांगोल्यात शेकाप विरोधात शिवसेना, अशी लढत होण्याची शक्यता आहे. या लढतीत पंढरपूर तालुक्यातील १५ गावांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण ही १५ गावे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या विचारांची आहेत.