लहान मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; अंगाचे लचके तोडल्याने जागीच मृत्यू

परभणीत काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्लायत एका लहान मुलाचा मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच परभणीमध्ये भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत पसरलीये. 

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत मुलगा अवघ्या आठ वर्षांचा होता. बाहेर तो एकटा असल्याने कुत्र्यांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. धाररोडवर ही विचित्र घटना घडलीये. नांदेडच्या एका रुग्णालयात मुलावर उपचार सुरू होते. मात्र कुत्र्यांनी विचित्र पद्धतीने चावा घेतल्याने सर्व उपचार अपयशी ठरलेत. उपचारा दरम्यान त्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरबाज असं मुलाचं नाव आहे.

पुण्यात भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या महिलेस मारहाण

राज्यात मोकाट कुत्र्यांची दहशत सर्वत्र पाहायला मिळतेय. मोकाट कुत्र्यांमुळे पुण्यातही एक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांना खाद्य देणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेने मारहाण केली आहे. मनिषा पवार या महिला गेल्या काही वर्षांपासून भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्याचे काम करतात. भटक्या श्वानांना खाद्य का देते, यावरून महिला पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेस मारहाण करून खाद्य फेकून दिलेय.

या प्रकरणी मोहिनी पैठणकर कुलकर्णी यांच्याविरुध्द पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील डीएसके विश्व येथील चंद्रमा सोसायटीत ही घटना घडली आहे. माजी मंत्री मनेका गांधी यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून या विषयात लक्ष घालण्याची मागणी केलीये. तसेच पवार यांनी पशुसंवर्धन तक्रार विभागाकडे या घटनेची तक्रार दाखल केली आहे.