दारु महागणार! मद्यपींच्या घशा-खिशावर कधीपासून भार?

दारू पिणाऱ्या आणि तळीरामांना महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार झटका दिला आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार असून राज्य सरकारने मूल्यवर्धित कर म्हणजे VAT मध्ये ५% वाढीची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम फक्त मद्यबाजारावरच नाही तर शेअर बाजारातही त्याचे पडसाद दिसून येऊ शकतात. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता गुंतवणूकदारांना काही शेअर्सवर लक्ष ठेवून राहावे लागेल.

मद्य कंपन्यांच्या शेअर्सवर काय परिणाम होणार
महाराष्ट्र सरकारने दारू कंपन्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला ज्याचा परिणाम सोमवारी दारू विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर दिसू शकतो. सरकारने १ नोव्हेंबरपासून मूल्यवर्धित करात (व्हॅट) ५ टक्क्यांवडून १० टक्के केला असून हा बदल फक्त क्लब, लाउंज आणि बारमध्ये दारू पिण्यासाठी लागू असेल. नॉन-काउंटर विक्री फक्त पूर्वीच्या किमतीवर असेल.

दरम्यान, जेव्हा एखाद्या वस्तूवर कर वाढवला जातो तेव्हा त्याचा परिणाम केवळ सामान्य लोकांवरच नाही तर कंपन्यांच्या कमाईवरही होतो. अशाप्रकारे सरकारच्या या निर्णयाचा परिणाम मद्यविक्री क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. तथापि, हा अल्पकालीन परिणाम असेल कारण भारतात दारूचा खप खूप जास्त होतो आणि सरकारलाही या व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळते.

मद्य कंपन्यांवर सरकारच्या निर्णयाचा परिणाम
युनायटेड स्पिरिट्स, युनायटेड ब्रुअरीज, रॅडिको खेतान, सुला विनयार्ड्स, टिळक नगर इंडस्ट्रीज, एसओएम डिस्टिलरीज आणि ब्रुअरीज), पिकाडली ॲग्रो इंड्स इत्यादी शेअर्सवर महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. लक्षात घ्या की याशिवायही भारतीय शेअर बाजारात इतरही अनेक कंपन्या आहेत.