Weather Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर पाऊस, तब्बल 18 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने अक्षरश: झोडपून काढलंय.

पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान, पुढील 3-4 दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.आयएमडीच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता (Heavy Rain) आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.मुसळधार पावसाची शक्यता असल्याने अति दक्षतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट असून, उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची (Rain Alert) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

तिकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळणार शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.