दारू पित असल्याची माहिती घरी दिल्याच्या रागातून; दगडाने ठेचून तरुणाकडून वृद्धेचा खून

दारू पित असल्याची माहिती घरी दिल्याच्या रागातून बावीस वर्षीय तरुणाने वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार आज उघडकीस आला. सुभाषनगरातील हॉरेब चर्चच्या कंपाउंडलगत ही घटना काल (ता. २१) रात्री घडली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या चार तासांत गुन्ह्याचा छडा लावत संशयित आरोपीस अटक केले.

लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ६५, मूळ गाव कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या राहणार संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्धेचे; तर प्रतीक विनायक गुरूले (वय २२, रा. प्लॉट नंबर ४, संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती क्षीरसागर काल (ता. २१) रात्री आठ वाजता नातीला घेऊन नवरात्र कार्यक्रम पाहण्यासाठी सुभाषनगरातील बाळूमामा मंदिर येथे गेल्या होत्या.

नातीला सोडल्यानंतर मात्र त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. त्या न सापडल्याने अखेर मुलगा गणेश क्षीरसागर याने मध्यरात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. त्यानंतर त्याने पुन्हा नातेवाईकांकडे चौकशी केली. तसेच परिसरात शोध घेतला. तरीही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही.

आज सकाळी चर्चच्या कंपाऊंडलगत एका वृद्धेचा खून झाल्याची चर्चा सुरू झाली. राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे तत्काळ दाखल झाले. वृद्धेच्या खुनाची वार्ता क्षीरसागर कुटुंबियांना समजली. चेहरा दगडाने छिन्नविछिन्न झाला असला, तरी त्यांनी लक्ष्मी क्षीरसागर यांना ओळखले. त्यानंतर त्यांचा आक्रोश सुरू झाला.

नात धनश्री व नातू विनित याने आजीला पाहून हंबरडा फोडला. परिसरात बघ्यांची गर्दी झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अज्ञाताचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना संशयित आढळल्याने त्यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

संशयित प्रतीक याने सिव्हिल डिप्लोमा केला असून, सध्या तो बेकार आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. श्रीमती क्षीरसागर यांनी त्याला तीन आठवड्यांपूर्वी दारू पिताना पाहिले होते. ही माहिती क्षीरसागर यांनी गुरूले कुटुंबियांना दिली होती. त्यातून त्याचे त्याच्या कुटुंबियांशी भांडण झाले होते. त्याचा राग त्याच्या मनात होता.

काल (ता. २१) तो रात्री आठ वाजता दारू विकत घेऊन सरनाईक माळ येथील चर्चच्या भिंतीलगत पित बसला होता. तेथे क्षीरसागर यांनी त्याला ‘तू येथे पुन्हा दारू पित बसला आहेस, मी तुझ्या घरी सांगते,’ असे म्हटल्यावर त्याने त्यांना चर्चच्या कंपाऊंडवर ढकलून दिले व त्यांच्या डोक्यात दगड घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर तो तेथून पळून गेला.

श्रीमती क्षीरसागर मूळच्या कामेरीच्या. त्या मुंबईत काही काळ राहायला होत्या. तेथून त्या १९९८ ला त्या रोहिदास कॉलनीत वास्तव्यास आल्या. घरोघरी जाऊन चप्पल शिवण्याचे काम करत होत्या.

परिसरात केवळ मद्यपींची वर्दळ

सुभाषनगर ते प्रतिभानगरकडे जाणाऱ्या मार्गावर भूतबंगला आहे. या मार्गावरील काही व्यावसायिकांच्या दारात सीसीटीव्ही आहेत. ते क्षीरसागर कुटुंबियांनी पाहिले असता, श्रीमती क्षीरसागर चालत घरी परतताना दिसल्या. तेथून पुढच्या सीसीटीव्हीत मात्र दिसून आल्या नाहीत, अशी चर्चा घटनास्थळी चर्चा होती. भूत बंगल्याशेजारील रिकामी जागा मद्यपींचा अड्डा म्हणून ओळखली जाते. रात्री मद्यपी वगळता परिसरात कोणी फिरकतही नाही.