प्रेमाच्या जाळ्यात ओढून सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर युवतीचा गैरफायदा घेत तिघांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यात घडली आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दारुमच्या माळरानावर वाईन पाजून युवतीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी तिचा मित्र व अन्य दोघांवर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी बाळकृष्ण उर्फ बाळू सदानंद तांबे (२६ वर्ष, रा. नाद, बौद्धवाडी), शैलेश शांताराम तांबे (३४ वर्ष, रा. दारुम), गणेश प्रकाश गुरव (२४ वर्ष, रा. शिरवली, देवगड) या तिघांना पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले असता २५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित तरुणीची ऑगस्ट महिन्यात आरोपीशी मैत्री झाली, त्यानंतर त्याचे प्रेमात रुपांतर झाले, मात्र त्याचाच गैरफायदा घेऊन अत्यंत धक्कादायक व संतापजनक प्रकार घडला आहे. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ती तरुणी बाळकृष्ण याला भेटायला तळेरे येथे आली. ते दोघं चायनिज खाऊन देवगड येथे बसने फिरायला गेले. रात्री उशीर झाल्याने तळेरे, आनंदनगर येथे त्यांनी एका ठिकाणी मुक्काम केला. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते नातेवाईकांकडे गेले. आम्ही लग्न करणार असल्याने आम्हाला पैसे हवेत अशी बतावणी केली. यावेळी नातेवाईकांनी समजूत काढून तू आता घरी जा, आपण नंतर बघू असे सांगितले.

त्यानंतर पुन्हा तळेरे येथे येऊन चायनीज सेंटरमध्ये युवतीला बसवून बाळकृष्ण गायब झाला. बाळकृष्णला संपर्क केल्यानंतर या युवतीला त्याने आपण दारूच्या दुकानात बसलो आहोत असे सांगितले. तेथून ते दोघे कासार्डे येथे गेले, तो तिला तिथे सोडून निघून गेला. काही वेळाने ती युवती बस स्थानकात पोहचली. तिने त्याला परत फोन केला. त्यानंतर तो शिरवली येथील गणेश गुरव याला त्याच्या रिक्षासह घेऊन आला. त्यानंतर एका वाईन शॉपीमधून त्या दोघांनी वाईनची बॉटल आणली.रिक्षात परत आल्यावर बाळकृष्णने त्या तरुणीला वाईन प्यायला लावली.

त्यानंतर रिक्षातून तिला दारुम येथे ते घेऊन गेले. तेथील माळरानावर ही तरुणी नशेत असताना तिघांनीही आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुलीने त्रास होऊ लागल्यानंतर या सगळ्या प्रकाराची कुटुंबीयांना माहिती दिली. त्या तिघांवर सामूहिक बलात्कार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करून गुरुवारी रात्री अटक करण्यात आल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर सावंत व कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.