वाळव्यात जयंतरावांच्या प्रतिष्ठेची, भाजपच्या नितीची रंगली चर्चा

सांगली व हातकणंगले मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा केंद्रबिंदू वाळवा (जयंत पाटील) ठरला. चंद्रहार पाटील व सत्यजित पाटील- सरूडकर या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा जयंत पाटील यांनी पेलली. होमपीचवरील वाळवा तालुक्यात त्यांनी आत एक बाहेर एक चालणार नाही, मी निवडणुकीला उभा आहे असे समजून मतदान करा, माझ्या भवितव्याची चिंता असेल तर सरुडकरांना मताधिक्य द्या, अशी साद घातली.

जाहीर सभेतील माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्वतःच्या राजकीय भविष्याचा दाखला देत समर्थकांना दिलेला इशारा, माजी खासदार राजू शेट्टींनी प्रस्थापितांविरोधात घेतलेली भूमिका, खासदार धैर्यशील मानेंच्या प्रचारात गोविंदाचे गाना भी होगा डान्स भी होगा डायलॉग, यातून जाहीर सभा गाजल्या. मतदारांचे मतदान ईव्हीएममध्ये सिल बंद झाले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात २७ उमेदवार असले तरी खरी लढत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, महायुतीचे धैर्यशील माने अशी तिरंगी रंगली.

प्रारंभी हा मतदारसंघ महाविकास आघाडीने स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांना सोडण्याची चर्चा झाली मात्र शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून लढण्यास नकार दिल्याने जयंतरावांनी उद्धव ठाकरे यांच्या करवी येथे सत्यजित सरूडकरांची फिल्डिंग लावल्याचे चर्चिले, त्यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतल्याचे सर्वश्रुत आहे.धैर्यशील माने व राजू शेट्टी यांना एकाच वेळी चितपट करण्यासाठी जयंतरावांची ही नीती मानली जाते.

हातकणंगलेची निवडणूक माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी वाळव्यात मताधिक्यासाठी प्रतिष्ठेची केली. जयंतरावांना शह म्हणून मताधिक्य रोखण्यासाठी भाजपने स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांना मदत पुरवली. यातून भाजपपासून एकाकी पडलेल्या धैर्यशील माने यांची नौका मोजक्याच शिवसैनिकांनी तारली. आता वाळव्यात जयंतरावांच्या प्रतिष्ठेची, भाजपच्या गुप्तनितीची अन् शिवसेनेच्या एकाकी झुंजीची चर्चा रंगली आहे.