हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गोटखिंडीत मशिदीत गणेश प्रतिष्ठापना

सगळीकडेच गणेशोत्सवाचे वातावरण आहे. काल गणेशमंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. घरोघरी गणेशाचे आगमन झाले असल्यामुळे चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण आहे. अशातच वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या झुंजार चौकातील मशिदीत शनिवारी आष्टा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्याहस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गोटखिंडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष लालासाहेब थोरात यांनी सांगितले की, 1980 पासून गेली 44 वर्षे येथील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी व न्यू गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही परंपरा अखंड जपली आहे. हिंदू-मुस्लिम बांधव दररोज एकत्र येऊन गणपतीची आरती करतात, तर हिंदू बांधव मुस्लिमांचा रोजा करीत असतात.

गणेशोत्सव काळात मुस्लिम बांधव मांसाहार करीत नाहीत. 1982 मध्ये मोहरम व गणेशोत्सव एकाच वेळी आले होते, त्यावेळी या मशिदीमध्ये एकाच ठिकाणी गणेश मूर्ती व पंजाची स्थापना करण्यात आली होती.