सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत) दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे सिंहगड किल्ल्यावर कोणतेही वाहन गुरुवारपर्यंत (23 मे पर्यंत) जाऊ शकणार नाही. मात्र अतकरवाडी मार्गे चालत गडावर जाता येणार आहे. पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या (Pune News) रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळतात. अशा धोकादायक दरडी आधीच दुरुस्त करण्यासाठी वन विभागातर्फे सिंहगड किल्ल्यावर जाणारा वाहनांसाठीचा रस्ता आजपासून गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. माात्र अतकवाडीमार्गे चालत गडावर जाता येणार आहे.
पावसळा सुरू झाला की निसर्गाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पुणेकर सिंहगडावर गर्दी करतात. मात्र पावसाळ्यात सिंहगड किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर अनेकदा दरडी कोसळतात आणि रस्ता पर्यटकांसाठी बंद करण्यात येतो. यामुळे अनेक पर्यटक गडावर अडकून पडतात किंवा गडावर जाणाऱ्या पर्यटकांना अडथळा निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या वतीने दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या जागांचा अभ्यास करण्यात आला होता. मागील वर्षी काही ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. परंतु दरड कोसळल्यामुळे काही जाळ्या निखळून पडल्या होत्या. वनविभागाच्या वतीने यावर्षी जाळ्या बसवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. या कामासाठी सिंहगडावरील रस्ता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.