सांगलीत एका प्रवासी बॅगेत बेवारस मृतदेह?

एका धक्कादायक घटनेमुळं सांगलीकर पुरते हादरुन गेले आहेत. सांगलीतील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. साधारणतः पंधरवड्यापूर्वी हा खून झाला असावा, असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत.

बेवारस प्रवासी बॅगेत आढळलेला मृतदेह पुरुषाचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि शरीरास नायलॉनच्या दोरीनं बांधल्याचं आढळलं आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यानं घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आलं.श्वान पथक आणि ठसे घेण्यासाठी तज्ज्ञांना घटनस्थळीच पाचारण करण्यात आलं. तसेच, गुन्हेगारांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा खून पंधरा दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता असल्यानं पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचं मोठं आव्हान आहे.

काल (सोमवारी) सायंकाळी पुलाच्या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती निनावी फोनद्वारे शिराळा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी याठिकाणी पाहणी केली असता एका बॅगेमध्ये सतरंजीमध्ये एक मृतदेह आढळून आला. हा मृतदेह सतरंजीमध्ये गुंडाळलेला असून पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहास गळ्याभोवती आणि शरीराला नायलॉनच्या दोरीनं बांधल्याचंही दिसून आलं.