कोल्हापूरातील तीन तालुक्यात चौघांची गळफास घेऊन आत्महत्या..

जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांनी आत्महत्या केल्या. एकोंडी (ता. कागल), वळिवडे (ता. करवीर), परखंदळे (ता. पन्हाळा) व तळंदगे (ता. हातकणंगले) येथे या दुर्दैवी घटना घडल्या.

याबाबत अधिक माहिती अशी, एकोंडी (ता. कागल) येथील आकाश विलास मातीवड्ड (वय १९) हा रविवारी (ता. २२) सायंकाळी घरातून बेपत्ता झाला होता. सोमवारी (ता. २३) सकाळी नंदगाव (ता. करवीर) येथे निवृत्ती दादू चौगुले यांच्या शेतात आंब्याच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे आढळले. परिसरातील शेतकऱ्यांनी गळफास सोडवून त्याला सीपीआरमध्ये (CPR) दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

दुसऱ्या घटनेत वळिवडे (ता. करवीर) येथील संभाजी मारुती साळोखे (वय ४४) यांनी रविवारी (ता. २२) सकाळी अकराच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव प्यायले. नातेवाईकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

तिसऱ्या घटनेत परखंदळे (ता. पन्हाळा) येथील युवकाने दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २२) सायंकाळी घडली. आकाश आनंदा कांबळे (वय २९) असे त्याचे नाव आहे. घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याच्यामागे पत्नी, एक मुलगी, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

तर तळंदगे (ता. हातकणंगले) येथे एकाने शेतातील झाडास दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विनोद दऱ्याप्पा हरळे (वय ४७, रा. मूळ गाव मोळे, ता. अथणी जि. बेळगाव. सध्या रा. कासार मळा, तळंदगे) असे त्यांचे नाव आहे. मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.