कृष्णा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलवाहिनी टाकण्याच्या कामाची अंतिम मुदत ३० जूनपर्यंत आहे. या कालावधीत काम पूर्ण करण्याच्या सूचना मक्तेदारास दिल्या आहेत. यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नसून मुदतीत काम पूर्ण न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असे उपायुक्त सोमनाथ आढाव यांनी सांगीतले. महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध नागरी प्रश्नांवर महापालिकेत बैठक झाली. यावेळी आता केवळ ३० ते ३५ टक्के काम झाले आहे. त्यामुळे मुदतीत काम होणे अशक्य असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यावर पुढे काय, प्रश्नावर आढाव यांनी वरीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले.
प्रारंभी कृष्णा योजनेच्या जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा आढावा पाणी पुरवठा विभागाकडील कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी घेतला. मजरेवाडी ते इचलकरंजी अशा मार्गावर तीन टप्प्यावर हे काम करण्यात येत असून यामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी त्यांनी सांगितल्या. विविध मंजुरी घेण्याबाबत रखडलेल्या प्रश्नावर प्रशासनाला धारेवर धरले. आचारसंहितेमुळे अडचणी येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिले. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदाई केले आहेत. पण त्या रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती झाली नसल्याची तक्रार केली. याबाबत मक्तेदारास सूचना दिली असून रस्ते दुरुस्तीनंतरच त्यांच्या कामाचे बिल काढण्यात येईल, अशी ग्वाही आढाव यांनी दिली.शहरात रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा जाब विचारला. एका पावसात हे काम वाहून जाईल, असा दर्जा कामाचा असल्याची तक्रार केली जाईल. काम दर्जेदार होण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येईल, असे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनी सांगीतले.
शहरातील गतिरोधक काढण्यात येत आहेत. त्याकडेही लक्ष वेधले. नियमबाह्य गतिरोधक काढण्यात येत असून, आता ते नियमानुसार बसवण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. बंद असलेल्या घंटागाड्यांबाबत आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी सविस्तर माहिती दिली. कचरा संकलन कामात विस्कळीतपणा आल्याच्या तक्रारी केल्या. आचारसंहिता संपल्यांनतर कचरा संकलित व वाहतूक करण्याच्या कामाची निविदा काढली जाणार असल्याचे डॉ. संगेवार यांनी सांगितले.सुळकूड योजनेच्या सद्य:स्थितीबाबत चर्चा झाली. २५ मेपर्यंत तांत्रिक अहवाल जिल्हाधिकारी शासनाला सादर करणार आहेत. या वेळेत अहवाल सादर न केल्यास जिल्हाधिकारी यांना भेटण्याचा निर्णय घेतला. उद्यानातील खराब झालेल्या खेळण्यांबाबतही चर्चा झाली. आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून खेळणी बसवण्याच्या तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या कामाला गती देण्याचा निर्णय झाला.