इचलकरंजी, कोल्हापूर महापालिकांनी आपले प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पुढील अडीच वर्षांत उभे करून पंचगंगा नदी सांडपाणीमुक्त करावी. नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभे करण्यासाठीचा विशेष प्रस्ताव तयार करून राज्य सरकारला सादर करावा.नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी व्यवस्था विकसित करावी,’ अशा सूचना आज जिल्हाधिकरी अमोल येडगे यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.२१) त्यांनी पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्नाबाबत बैठक घेतली.
या बैठकीला महापालिका, जिल्हा परिषद, इचलकरंजी महापालिका, जलसंपदा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी काय उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘कोल्हापूर महापालिकेतील सहा एम.एल.डी प्रक्रिया प्रकल्पाचे काम ऑक्टेबरअखेर पूर्ण करा. तसेच ४३ एम.एल.डी.क्षमता असणाऱ्या तीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे काम सप्टेंबर महिन्यात सुरू करा.
कोल्हापूर शहरातील सात नाले प्रक्रिया प्रकल्पाकडे वळण्यासाठीचे आराखडा बनवून कार्यवाही करावी. इचलकरंजी येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ५२९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करावी. सर्व प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी पुढील अडीच वर्षांत पूर्ण करून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावेत. महापालिका, ग्रामपंचायत यामधील सांडपाणी नदीत जाणार नाही, अशी व्यवस्था करून नदी सांडपाणीमुक्त करावी.