हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील युवा चांदी उद्योजक सम्मेद अनिल पाटील (वय २३, रा. राजगुरुनगर) याने मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.सम्मेद पाटील याचा हुपरी राजगुरुनगर येथे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. घरातील मंडळी कोल्हापुरात कार्यक्रमासाठी गेली होती. घरी कोणी नसलेल्या वेळेत विषारी द्रव्य प्राशन केल्याने सम्मेद बेशुद्ध होऊन जागेवरच पडला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळाली.
त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, तर व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर रुग्णालय पोलिस चौकीत झाली असून, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सम्मेदने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणासाठी उचलले, याची उलटसुलट चर्चा शहरात होती.