हुपरी येथील पारंपरिक यात्रेला हुपरी नगरपरिषद प्रशासन व प्रांताधिकारी यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे यात्रेला फटका

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. परगावहून यात्रांसाठी भाविक गावाकडे येतानाचे चित्र दिसत आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील यात्रेसाठी खूपच भाविक गर्दी करतात. हुपरी येथील पारंपरिक यात्रेला हुपरी नगरपरिषद प्रशासन व प्रांताधिकारी यांच्या आडमुठ्या भुमिकेमुळे यात्रेला फटका बसला आहे. त्यामुळे यात्रेवर परिणाम होणार असून यात्रा पन्नास टक्केच भरेल असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

नगरपरिषद व प्रांताधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांमधून – संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या विस्तीर्ण जागेवर यात्रा भरवण्याचा अधिकार यात्रा कमिटीला दिला आहे. नगरपरिषदेने महसूल गोळा करण्यासाठी ठेका पध्दत अवलंबली आहे. यातूनच वादाला तोंड फुटले. स्थानिक पातळीवर बिघडलेली परिस्थिती सावरण्यासाठी लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करुन सकारात्मक तोडगा काढण्यास नगरपरिषद प्रशासनाकडून फार उशीर झाला. 

गावबंद सारख्या टोकाच्या दिशेने ज्यावेळी वाटचाल सुरू होते, त्यावेळी राजकारण बाजूला ठेवून समाजाचे हित आणि देवीच्या उत्सवात येणारी बाधा यावर विचारमंच झाले नाही याचे आश्चर्य वाटते. गेल्या चार दिवसांपासून हा मुद्दा धुमसत आहे. याची जाणीव संबंधित प्रशासनालाही नाही का? असा संतप्त सवाल जनतेमधून उपस्थित केला जात आहे.