उजनी जलाशयात बोट उलटून सहा जण बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ बोट उलटल्याची घटना घडली आहे. प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोटउलटली असून पथकातील चार जणांसह एक स्थानिक बुडाल्याने महाराष्ट्र हादरला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवरा नदीत एक व्यक्ती बुडाला होता. त्याचा शोध SDRF पथकाकडून सुरु होता. शोधकार्य सुरु असतानाच पथकातील चार जणांसह 1 स्थानिक नागरिक बोट उलटल्याने पाण्यात बुडाले. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळ ही दुर्दैवी घटना घटना घडली आहे.
यात एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून तर दोघांचा शोध सुरू आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दिली आहे.
काल नदीपात्रात दोन जण पोहण्यासाठी आले असता ते दोघेही बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा मृतदेह शोधण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले. एसडीआरएफच्या पथकाकडून सकाळी सहा वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी दुर्दैवाने एसडीआरएफची बोट पाण्यात उलटली. यात पाच जण बुडाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाचा शोध घेतला जात आहे, असेही हिंगे यांनी सांगितले आहे.