जयंत पाटील यांचे विरोधक की निशिकांत पाटील यांचे ?राजकीय पक्षाचे बॅनर वापरून तोडपाणीचा व्यवसाय करणाऱ्यांनी व निवडणुकांकडे सुगी म्हणून पाहाणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये. जे लोक जयंत पाटील यांना विरोधक मानतात त्यांनी ३५ वर्षांत एकदातरी जयंत पाटलांच्या विरोधात निवडणूक लढविली का? त्यामुळे ते जयंत पाटलांचे विरोधक आहेत की निशिकांत पाटलांचे हे आधी त्यांनी जाहीर करावे, असा पलटवार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल महाडिक, विक्रम पाटील व आनंदराव पवार यांच्यावर केला. खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप राहुल महाडिक, विक्रम पाटील, आनंदराव पवार यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना .इस्लामपूर आयोजित बैठकीत बोलताना भाजप पदाधिकारी.पाटील म्हणाले, निवडणुका आल्या की पक्ष व नंतर गट म्हणून काम करणाऱ्यांचा जयंत पाटील यांच्या विजयात असलेला वाटा तालुक्यातील जनतेला माहीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राहुल महाडिक यांना संचालक पदाची लॉटरी जयंत पाटील यांच्यामुळेच लागली.शहराध्यक्ष अशोक खोत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांना विचारात घेतले नव्हते.
तरीही आम्ही सर्वांनी धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी सभा, बैठका घेतल्या.भाजप नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन केले. जी जबाबदारी दिली ती पार पाडली. मात्रख निशिकांत पाटील यांची वाढती लोकप्रियता व संघटन कौशल्य पाहून आता त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडता न आल्याने हे लोक आता निशिकांत पाटील यांच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले, भाजप व शिवसेना पक्षाच्या विचारधारेला डाग लावण्याचे काम या मंडळींनीच केले आहे. भाजप जिल्हा क्रीडा प्रकोष्ठ संयोजक अजित पाटील म्हणाले, स्वत: ला पक्षाचे एकनिष्ठ समजणारे विक्रम पाटील, अमित ओसवाल इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर नामकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीवेळी का खुराड्यात बसले होते? हीच का तुम्हीच पक्षनिष्ठा. जे या तालुक्यातील नाहीत त्यांनी आमच्या ‘डीएनए’ वर बोलू नये. आमच्यावर टीका करणाऱ्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ.