आटपाडी नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यानेच शहरातील पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता, गटारींसह अन्य प्रश्न गंभीर बनले आहेत. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले असले तरी कामकाज मात्र अद्यापही ग्रामपंचायतीप्रमाणेच सुरू आहे. शिवाय नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन आटपाडीचे तहसीलदार तथा नगरपंचायतीचे प्रशासक सागर ढवळे यांना सामाजिक कार्यकर्ते संभाजी देशमुख यांनी दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, आटपाडी नगरपंचायत स्थापनेला सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
या कालावधीत एक वगळता अन्य मुख्याधिकारी हे प्रभारीच होते. त्यामुळे नगरपंचायतीच्या कामाला अपेक्षित मिळाली गती संभाजी देशमुख नाही. परिणामी नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात झाले आहेत. शहराच्या जवळील स्वतंत्र गावे असलेली मापटेमळा, भिंगेवाडीच्या समावेशाने नगरपंचायतीची हद्द मोठी झाली. मात्र, प्रशासकीय यंत्रणा तितक्या क्षमतेने अद्याप कार्यरत नाही.शहरातील अनेक भागात अस्वच्छता पसरली असून गटारे तुंबली आहेत. अनेक ठिकाणी पाणी वेळेवर येत नाही. विद्युत खांबावरील वीज गायब आहे. गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव अद्याप पडून आहेत.