आटपाडी नगरपालिकेची कारवाई; खुल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविले 

आटपाडी नगरपालिकेच्या नावे असणाऱ्या भूखंडावर केलेल्या अतिक्रमणावर सोमवारी, दि १६ रोजी नगरपंचायतने हातोडा चालवत ते जमीनदोस्त केले. अनेक वर्षांपासून या अतिक्रमणाबाबत वाद होता. नगरपंचायतचे मुख्याधिकारी व प्रशासक यांनी कारवाई करत अतिक्रमीत शेड उचकटून टाकले. आटपाडीतील महावितरण कार्यालयासमोरील गट नंबर ४११२ यामध्ये १९९७ साली मूळ मालक शांता विलास जैन / रणदिवे, नंदकुमार गुंडाप्पा जैन/ रणदिवे यांनी बिगरशेती करत प्लॉट पाडून विक्री केले होते. यामध्ये काही भाग हा खुला आरक्षित ठेवला होता. मात्र शेजारीच असलेल्या गट नंबर ४११० मधील तावरे यांनी ४११२ / ५३ या गटात अतिक्रमण करत पत्रावजा शेड उभे केले होते. तो भूखंड २० जुलै २०२३ रोजी नगरपंचायतला बक्षीसपत्र करून देण्यात आला होता. याबाबत नगरपंचायत व तावरे यांच्यामध्ये वाद सुरू होता.

तावरे यांनी हायकोर्टात दावा दाखल केला होता. दरम्यान, २९ नोव्हेंबर २०२४ रोजी हायकोर्टाने तावरे यांचा दावा फेटाळला. तर अतिक्रमीत शेडवर नगरपंचायतने १२ डिसेंबर रोजी अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तर सोमवारी अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर राबवत भूखंड मोकळा केला. शहरातील मोक्याच्या जागेत खुल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात नगरपंचायतला यश आले आहे. याबाबत नागरिकांकडून मुख्याधिकारी वैभव हजारे यांचे अभिनंदन केले जात आहे. काही वर्षांपूर्वी आटपाडीचे तत्कालीन तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांनी शहर अतिक्रमण मुक्त केले होते. त्याचप्रमाणे वैभव हजारे यांनीही धाडसी निर्णय घेऊन शहर अतिक्रमणमुक्त करावे, अशी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.