पीककर्ज वाटपाच्या जिल्हास्तरीय समिती तसेच तालुकास्तरीय समितीच्या बैठकीला वारंवार गैरहजर राहणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या अधिकाऱ्यांना थेट बँकेतून उचलून आणा, असे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत.पीककर्ज तसेच पीएमईजीपी व सीएमईजीपी कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी धारेवर धरले आहेत. कर्जवाटप जिल्हास्तरीय समितीच्या तसेच तालुकास्तरीय बैठकांना बँक अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना अधिकारी मात्र पाठ फिरवत आहेत.
यासंदर्भात अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तरी अधिकारी येईनात. बैंक प्रतिनिधीला देखील पाठवेनात. यामुळे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ८० टक्क्यांच्या आत राहिले आहे.विशेष म्हणजे, यात राष्ट्रीयीकृत बँकांचा वाटा केवळ वीस ते पंचवीस टक्केच आहे. यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना बैठकांना हजेरी लावणे बंधनकारक केले आहे.
जे अधिकारी येत नाहीत, अशांना बँकेतील ग्राहकांसमक्ष बँकेतून उचलून आणा, असे आदेश आशीर्वाद यांनी पोलिसांना दिले आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे.पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांनी दुष्काळाचे दिले आहे. दुसरीकडे खासगी बँकांनी तीनपट उद्दिष्ट पूर्ण केले. शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे बंधनकारक आहे. ज्यांचे सिबिल स्कोअर चांगले आहे, अशांना सर्वप्रथम कर्ज मिळणे गरजेचे आहे.या उद्देशाने बँक अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय बैठकांना हजेरी लावण्याची सूचना केली आहे. जे अधिकारी येणार नाहीत, अशांना बँकेतून उचलून आणण्याची सूचना पोलिसांना केली आहे.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर