आता ‘मुंबईची GTA’ गेम येणार, गेमर्सना मिळणार फ्री-प्रीव्ह्यू!

गेमिंग क्षेत्रामध्ये भारतीय कंपन्या या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. अशीच एक कंपनी GameEon आपल्या ‘Mumbai Gullies’ या गेमवर काम करत आहे. या गेमला ‘मुंबईची GTA’ म्हटलं जातंय. ही गेम लाँच होण्यापूर्वी याचं एक फ्री व्हर्जन लाँच केलं जाणार असल्याचं कंपनीचे फाउंडर निखिल मालंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आयजीएन वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निखिल यांनी ही माहिती दिली. GTA Vice City प्रमाणेच ही एक गँगस्टर बेस्ड ओपन वर्ल्ड गेम असणार आहे. आपण Vice City गेमवरुनच प्रेरणा घेत गेम डेव्हलपिंगच्या क्षेत्रात आलो असल्याचंही निखिल यांनी यावेळी सांगितलं.

फ्री व्हर्जन येणार

निखिल यांनी सांगितलं, की मुंबई गलीज गेमचं एक फ्री व्हर्जन आम्ही लाँच करणार आहे. हे एक ट्रायल व्हर्जन असणार आहे. यामुळे गेमर्सना अंदाज येऊ शकेल की ही गेम नेमकी कशी आहे. तसंच, गेमर्स यामध्ये सुधारणा देखील सुचवू शकतील.

ट्रायल व्हर्जननंतर गेमचं मुख्य एडिशन रिलीज करण्यात येईल. हे व्हर्जन पेड असेल. ट्रायल व्हर्जनमधील इव्हेंट्स हे मुख्य गेमला कनेक्टेड असतील. मुंबई गलीज ही गेम भारतीय गेमर्सना जास्त आपलीशी वाटेल, त्यामुळे ही भरपूर लोकप्रिय होईल असा विश्वास देखील निखिल यांनी व्यक्त केला.