विजयादशमी म्हणजे रामाचा रावणावर विजय, तसाच नीतीचा अनीतीवर मात, असेही मानले जाते. याच दिवशी पौराणिक काळापासून शस्त्रपूजनांचीही परंपरा आहे. जी आजही कायम आहे.
मात्र, पारंपरिकता जोपासतानाच आजच्या डिजिटायझेशनच्या जमान्यात आधुनिक शस्त्रास्त्रांचेही पूजन केले जाते.
तलवारी, बंदुकांचे पूजन पारंपरिकतेने केली जातेच; परंतु बदलत्या काळानुरूप अन् आजच्या डिजिटायझेशनमध्ये संगणक, लॅपटॉप, वाहनांचेही पूजन त्याच श्रद्धेने केले जाते आहे.
दसऱ्यालाच देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर स्वारी केली. महाभारतामध्ये पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शस्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती.
अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शास्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तोही हाच दिवस होता.
काही ऐतिहासिक दाखले असून, यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानीदेवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला होता. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्त्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत.
अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. त्याला सीमोल्लंघन म्हणत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस पौराणिक काळापासूनच मानला जातो.
आयुधे, शस्त्रास्त्रांचे पूजन
सैन्य, पोलिस दलातर्फे त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे, हत्यारांची विधिवत पूजन केले जाते. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या शस्त्र भांडार विभागात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते, तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते बंदुकांसह शस्त्रास्त्रांचे पूजन मंगळवारी (ता. २४) केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे, पोलिस ठाणेनिहाय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते ठाण्यातील शस्त्रास्त्रांचे पूजन केले जाणार आहे.
क्रीडा संघटनांकडूनही पूजन
सैन्य, पोलिस दलात त्यांच्या शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे, क्रीडा संघटनांकडूनही त्यांच्या नित्याच्या वापराच्या साहित्याची पूजा केली जाते.
सातपूर क्लब हाउस येथे एक्सएल टार्गेट शूटर्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (ता. २४) शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तूल, रायफल्सचे विधिवत पूजन केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे, यशवंत व्यायामशाळा येथेही विविध क्रीडा प्रकारातील साहित्यांचे पूजन केले जाते. तलवारबाजी, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, जिम्नॅशियम, मलखांब, कॅरम, टेनिस, टेबल टेनिस आदी संघटनांकडून खेळाडूंच्या उपस्थितीत क्रीडा साहित्यांचे पूजन केले जाते.
टूल्सचेही होते पूजन
घरोघरी अलीकडच्या काळात शस्त्रास्त्रांची जागा आधुनिक हत्यारांनी जशी घेतली आहे तशीच ज्या साहित्याच्या वापराने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्या साहित्याची वा हत्यारांची पूजाही दसऱ्याला केली जाते.
गॅरेज दुकानात त्याच्याकडील वाहन दुरुस्तीसाठी वापरण्यात येणारे पान्हे, स्क्रूड्रायव्हर, नट-बोल्टचे पूजन केले जाते. सराफी दुकानातही दागदागिने बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांचे पूजन केले जाते.
आस्थापनांमध्ये संगणकांचे पूजन
आजचा जमाना डिजिटायझेशनचा. हिशोबांच्या वह्यांची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांसह बँका, खासगी आस्थापनांमध्येही संगणकांवर नित्याची कामे चालतात.
दसऱ्यानिमित्ताने संगणक, लॅपटॉपचेही विधिवत पूजन केले जाते. औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कंपन्यांमध्ये मशिनरींचेही पूजन केले जाते.
वाहनांचेही पूजन
सायकल, दुचाकी, चारचाकी, रिक्षा, मोठी वाहनांची स्वच्छता करून दसऱ्याला विधिवत पूजन केले जाते. शाळांमध्ये वह्या-पुस्तकांसह विद्यार्थी लेखनासाठी वापरणाऱ्या पेन-पेन्सिलचेही पूजन करतात.