पुण्यात म्हाडाचा मोठा प्रकल्प

नवं घर खरेदी करण्याचा विषय येतो तेव्हातेव्हा आर्थिक जुळवाजुळव करताना बऱ्याचजणांची दमछाक होते. अशा परिस्थितीमध्ये MHADA, सिडको यांसारख्या संस्थांच्या गृहयोजना सामान्यांना मोठा दिलासा देतात. अशीच एक योजना पुणे जिल्ह्यात साकारली जाणार असून, म्हाडाच्या या योजनेमुळं अनेकांनाच खिशाला परवडणारी घरं खरेदी करता येणार आहेत.

पुणे जिल्ह्यात परवडणारी घरं उपलब्ध करून देण्यासाठी ‘म्हाडा’ (MHADA)ने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या गृहयोजनेसाठी खेड आणि मुळशी तालुक्यातील सुमारे 57 एकर सरकारी गायरान जमीन जिल्हा प्रशासनाने ‘म्हाडा’कडे सुपूर्द केली आहे. या जमिनीवर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने सुमारे 13301 घरं बांधण्यात येणार आहेत.

पुण्यातील रोहकल इथं 8000, तर मुळशीतील नेरे गावात ५000 हून अधिक घरं उभारली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी 2194 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील चार वर्षांमध्ये योजनेअंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम पूर्ण करून ती सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मानस म्हाडानं ठेवला आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर आणि जिल्हा, वसई (जि. पालघर) इथं विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5285 सदनिकांसह भूखंडांचीसुद्धा सोडत काढण्यात येणार असून आहे. ज्यासाठी 25 ऑगस्टपर्यंत यासाठी 125397 अर्ज आले आहेत. यामध्ये 89000 हून अधिक अर्जदारांनी अनामत रक्कमही भरली आहे.

दरम्यान, म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील गाळ्यांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या नव्या वेळापत्रकानुसार ई-लिलावासाठी नोंदणी, ऑनलाइन अर्ज, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम ऑनलाइन भरण्यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.