मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी 27 ऑगस्टपासून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सण साजरा होतो. अशात, गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर केल्यानंतर मोठा ताण पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होताना दिसू शकेल. त्यातच मनोज जरांगे (Manoj Jarange)आंदोलनसाठी मुंबईत दाखल झाल्यास कायदा व सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. याचदरम्यान, भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे.
उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जरांगे मोर्चाने मुंबईत येत आहेत. अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये, यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच त्यांना विनंती आहे, असं केशव उपाध्ये यांनी सांगितले. उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विनाव्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. ही व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी सगळ्यांचेच सहकार्य गरजेचे असल्याचं केशव उपाध्ये म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यासाठी देवेंद्र फडणवीसांचे सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्रीगणेशा केला होता. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे. मराठा समाजातील तरुणांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या सरकारच्या अपयशाने त्यात विघ्न आले व मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. पण देवेंद्र फडणवीस अडचणी दूर करीत मार्ग काढत आहेत, असं केशव उपाध्ये यांनी सांगितले.
