सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच जोर खात आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांचा समावेश करण्यात यावा, या मागणीकरिता व मराठा समाजाचे नेते जरांगे- पाटील यांच्या आवाहनास प्रतिसाद देत इचलकरंजी शिवतीर्थ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्रदक्षिणा घालून आंदोलन सुरू करण्यात आले. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिवतीर्थावर सकाळी दहापासून मराठा समाज बांधव भगवी टोपी तसेच झेंडे घेऊन दाखल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.