इचलकरंजी पाॅवरलूम असोसिएशनच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश!

नववर्षापासून धनादेश भरलेल्या दिवशीच समाशोधन (क्लिअरींग) प्रक्रिया पूर्ण होणार आहे.त्यामुळे धनादेशाची रक्कम त्याच दिवशी संबंधित बँक खात्यावर जमा होणार आहे. याबाबत इचलकरंजी पाॅवरलूम असोसिएशनच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने याबाबतची पूर्वसूचना दिली होती. आता प्रत्यक्षात त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या बदलामुळे व्यापारी वर्गाला चांगला फायदा होणार आहे.

पॉवरलूम असोसिएशनने दोन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रमुखांकडे ज्या-त्या दिवशी समाशोधन जमा मिळावे, यासाठी पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती. यातील तांत्रिक अडचणींबाबत चर्चा झाली होती. दोन ते तीन वर्षांतील सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समाशोधन रोजच्या रोज जमा देण्याबाबत बँकिंग क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय घेतला.