प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सायझिंग उद्योग बंद करण्याची नोटीस देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.अशा नोटिसा आल्यास सायझिंग उद्योग पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहे. सायझिंगधारक असोसिएशनने याबाबतचा निर्णय घेतला आहे. सायझिंग उद्योगातील पाण्याचा विसर्ग रोखण्यासाठी अत्याधुनिक प्रक्रिया प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यात येईल अथवा सध्याच्या प्रकल्पात आवश्यक ती सुधारणा केली जाईल असेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे. बायोडायजेस्ट प्रकल्प उभारणी केल्यानंतर तयार होणारे स्लज उचलण्याबाबत परवानगी देण्याची मागणी मंडळाकडे तीन वर्षांपासून केली आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी दहा ते बारा कोटींची गुंतवणूक करावी लागणार आहे.
तीन महिन्यांत हा प्रकल्प उभारणे अशक्य आहे, पण त्याला मंडळाकडून मुदतवाढ दिली जात नाही. हा प्रकल्प पूर्ण करा, अन्यथा सायझिंग उद्योगाला क्लोजरच्या नोटिसा काढण्याची भीती दाखवली जात आहे. प्रकल्प उभारणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व जिल्हाधिकारी यांच्याकडून जागा उपलब्ध होत नाही. तीन महिन्यांपूर्वी मंडळाने जागा विकत घेण्याची सूचना केली होती, पण स्लज उचलण्यासाठी परवानगी दिली जात नसल्यामुळे बहुतांश उद्योजक या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यास तयार नाहीत, अशी माहिती सायझिंगधारक असोसिएशनकडून दिली.