गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठ्याचा बट्टाबोळ झाला आहे. पाच-सहा दिवसांतून वेळी-अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांतून विशेषत: महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यात आणखी भर पडणार आहे. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला शिरढोण येथे गळती लागल्याने कृष्णेतून होणारा पाणी उपसा बंद करणेत आला आहे.
त्यामुळे नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागणार आहे. पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणी पुरवठा केला जात आहे. मजरेवाडी कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेतून ५४० अश्वशक्तीच्या दोन पंपातून ४५ एमएलडी पाणी उपसा केला जातो. परंतु गळतीमुळे शहरात ३५ एमएलडी पाणी मिळते तर पंचगंगेतून ९ एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे दिवसाला ४५ एमएलडी पाणी मिळते. परंतु शहराला ७० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. पाणी उपसा कमी होत असल्याने एक दोन दिवसआड पाणी पुरवठा केला जातो.
गेल्या आठवड्यामध्ये कृष्णा नळपाणी पुरवठा इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेच्या जॅकवेलमधील गाळ काढणे तसेच जल शुध्दी केंद्रातील नवीन टाकी जोडणे या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामध्ये कृष्णा योजनेच्या वितरणनलिकेला गळती लागल्याने आता पाण्यासाठी ठणठणाट होणार आहे. त्यामुळे शहरवासियांना पंचगंगेवर अवलंबून रहावे लागणार आहे.गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. तसेच येथील जलशुध्दीकरण केंद्रातील जुन्या २२ लाख लिटर पाण्याच्या टाकीला नव्याने बांधलेल्या ९ लाख लिटर टाकी जोडण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केले होते.