सध्या इचलकरंजी शहरात अतिक्रमण भरपूर प्रमाणात झालेले पहायला मिळतच आहे. रस्त्यांच्या कडेला अनेक गाडे, स्टॉल यामुळे वाहतुकीसाठी वाहनधारकांना अडचण निर्माण होऊ लागते. अश्यातच अनेक मांसाहारी स्टॉल मुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. अनेक जीवघेणे हल्ले देखील होतानाचे चित्र आहे. सध्या या भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत.
इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणेच्या कामाचा तिसरा टप्पा सुरू करणेत आलेला आहे.
तथापि शहरातील विविध ठिकाणी असलेल्या चिकन सिक्स्टी फाईव्ह , बिर्याणी अशा मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आलेने अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी गुरुवारी १६ जानेवारी रोजी आपल्या दालनात शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीत शहरातील मांसाहारी खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिल्लक रहात असलेले पदार्थ आपल्या जवळच्या डस्ट बीनमध्ये जमा करुन महानगरपालिका प्रशासनाकडून रात्री उपलब्ध करून देणेत आलेल्या घंटागाडी मध्येच टाकावेत अन्यत्र कुठेही टाकु नयेत जेणेकरून त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
याचबरोबर कोणत्याही परिस्थितीत बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक कॅरी बॅगचा वापर करणेत येवु नये असे आदेश दिलेले आहेत. तथापि ज्या व्यावसायिकांकडून या आदेशाचे उल्लंघन केलेचे निदर्शनास येईल. त्यांचेवर दंडात्मक कारवाई करणेचे आदेश यावेळी देणेत आले आहेत.