मुख्यमंत्र्यांना राजू शेट्टीचा इशारा!

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे -बंगळूर महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज बुधवारी करण्यात आले. राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र (पाणी मीटर) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे -बंगळूर महामार्गावरील आंदोलना दरम्यान दिला.

दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत ६ जून रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करून ६ जूननंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले. एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहे. तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दसपट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत.

याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घेण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.