यंदा उन्हाळ्याने भल्याभल्यांचा घामाटा काढला. उन्हाचा कहर झाला. उष्ण वाऱ्याने कुलरला पण यंदा बाद केले. विदर्भ, खानदेश, मराठवाड्यात पाऱ्याने रेकॉर्ड मोडीत काढले. मुंबईसह आजुबाजूच्या परिसरात उकाड्याने नागरिक हैराण झाले. सर्वच जण मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होते. आता मान्सूनने सांगावा धाडला आहे. अवघ्या काही तासांतच या राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. दक्षिण पश्चिम मान्सूनच्या पूर्व अंदाजानुसार, गुरुवारी, 30 मे 2024 रोजी मान्सून केरळच्या किनारी आणि पूर्वोत्तर भागात दाखल होईल.
त्यामुळे अनेक भागात पाऊस पडेल.भारतीय हवामान विभागाने (IMD) बुधवारी 24 तासांत मान्सूनचे चित्र कसे असेल, याचा अंदाज वर्तविला. पुढील 24 तासांत मान्सून केरळच्या दक्षिण-पश्चिम भागात दाखल होईल. त्यासाठीचे अनुकूल वातारवरण दिसत असल्याचे विभागाने जाहीर केले आहे. यापूर्वी आयएमडीने 15 मे रोजी, केरळात मान्सून 31 मेपर्यंत आनंदवार्ता पेरणार असल्याचा दावा केला होता.
हवामान तज्ज्ञांनुसार, रविवारी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशात दाखल झालेल्या रेमल चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. या वादळाने मान्सूनचा प्रवाह बंगालच्या उपसागराकडे खेचून घेतला. त्यामुळे पूर्वोत्तर राज्यात मान्सून लवकर दाखल होत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडला.
परिणामी मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.हवामानातील या बदलामुळे तर चक्रीवादळामुळे पूर्वोत्तर राज्यात लवकरच आबादाणी होणार आहे. पूर्वोत्तरमधील अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिजोरम, मणिपूर आणि आसाम या राज्यात पाऊस 5 जून रोजी हजेरी लावण्याची शक्यता आहे.