बीडच्या परळी येथील वैद्यनाथ बँकेची (Vaidyanath Bank) नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. आतापर्यंत 17 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. सध्या तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे पारडे जड आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे पॅनल पिछाडीवर आहे. अनेक ठिकाणी पवार गटाच्या उमेदवारांना खाते देखील उघडता आले नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होईल. तर निवडणुकीपूर्वीच माजी खासदार प्रीतम मुंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरासरी एकूण 37.5 टक्के इतके मतदान झाले आहे.
वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी परळीपासून मुंबईपर्यंतच्या 36 मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. एकूण 43 हजार 962 मतदारसंख्येपैकी 16 हजार 287 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी 37.5 इतकी नोंदवली गेली आहे. नेहमीपेक्षा कमी मतदान झाल्याचे या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी स्पर्धा होती. त्यापैकी चार जागा आधीच पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथराव मुंडे जनसेवा पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 13 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली.
