येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता

येत्या 48 तासांत राज्यातील आचार संहिता शिथिल होण्याची दाट शक्यता आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याचसोबत काही भागांत अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यात आचार संहिता असल्यानं सरकारी पातळीवर मोठे निर्णय घेता येत नाहीत, तसेच मंत्र्यांना पाहणी दौरेही करता येत नाहीत.

याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारन  निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केलेली. दरम्यान, निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या निर्णयाचा गांभीर्यानं विचार केला असून येत्या 48 तासांत आचार संहिता शिथील केली जाण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत राज्यातील आचार संहिता उठवण्याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती महायुतीतील एका ज्येष्ठ मंत्र्यानं एबीपी माझाला दिली आहे.

महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया (Maharashtra Lok Sabha Election 2024) आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं नुकतीच निवडणूक आयोगाकडे केली होती. राज्य सरकारच्या या मागणीचा येत्या 48 तासांत विचार होऊन राज्यातील आचार संहिता उठवण्याचा मोठा निर्णय आयोग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.