लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. निकालाबाबत सर्व कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेली आहेच. अशातच लोकसभा निवडणुकीचा फैसला येण्याअगोदरच इस्लामपूर- शिराळा मतदारसंघातील बहुतांशी प्रमुख नेते आगामी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघामध्ये विरोधकांनी आतापासूनच शड्डू ठोकले आहेत.
यावरूनच जयंत पाटील विरोधक नेत्यांमध्ये अंतर्गत वादळ उठले आहे. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये जयंत पाटील यांची आगामी भूमिका काय असणार? यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. निशिकांत पाटील यांना गेल्या निवडणुकीपासूनच आमदारकीचे वेध लागले आहेत. परंतु इस्लामपूर मतदारसंघ शिंदेसेनेकडे असल्याचे सांगत जिल्हाप्रमुख आनंदराव पवार मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. धैर्यशील माने यांना लॉटरी लागली तर इस्लामपूर पुन्हा शिंदेसेनेकडेच येईल, असा ठाम विश्वास त्यांना आहे.
तर भाजपचेच राहुल महाडिक गौरव नायकवडी हे देखील दावेदार आहेत. इस्लामपूर – शिराळा मतदारसंघातील जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांची भूमिका शरदचंद्र पवार पक्षाशी ठाम आहे. मात्र लोकसभा निकालानंतर आगामी काळात या दोघा नेत्यांच्या भूमिकेवर आजही कार्यकर्त्यांत उलट-सुलट चर्चा आहे. शिराळा मतदार संघात आमदार होण्यासाठी भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक इच्छुक आहेतच याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक आगामी विधानसभेलाही शह ठोकणार आहेत. एकंदरीत इस्लामपूर – शिराळा मतदारसंघात भावी आमदारांसाठी इच्छुकांमध्ये मोठी चुरस आहे.