मतदारसंघात इच्छुकांची जोरदार तयारी सुरू! चुरशीच्या लढती होणार

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजचा दिवसच आहे. सांगली जिल्ह्यातील बहुतेक मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली असून चुरशीच्या लढती होणार आहेत. अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी जोरदार तयारी केली असून शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. पलूस-कडेगाव मतदार संघात माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे.

डॉ. कदम यांनी आमदार अरुण लाड यांची भेट घेतली आहे. डॉ. कदम यांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. या ठिकाणी दुरंगी की तिरंगी निवडणूक होणार, याची उत्सुकता आहे. शिराळा मतदार संघात आमदार मानसिंगराव नाईक यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. देशमुख सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला. वाळवा मतदार संघातील 48 गावांचा समावेश शिराळा मतदार संघात होतो.

या मतदारसंघात महाडीक गटाचीही ताकद आहे. त्यामुळे या लढतीकडेही लक्ष असणार आहे.वाळवा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. ते आज मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या मतदारसंघात एकास एक लढत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी चुरशीने लढत होईल, असे मानले जात आहे.