सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील….

शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या बंडात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खंबीर साथ दिली होती. त्या वेळी शिंदे यांच्या पाठीशी उभं राहण्याचे कामही शहाजी पाटील यांनी केले होते. गुवाहाटीत असताना सांगोल्यातील आपल्या सहकाऱ्याशी बोलताना त्यांचा ‘काय झाडी…काय डोंगार…. काय हाटील’ हा डायलॉग चांगलाच गाजला होता. त्यानंतर शहाजी पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित झाले होते.

सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात ॲडमिट केले आहे. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून गुडघ्यावर उपचार करण्यात आले आहेत. आमदार पाटील यांना आणखी दोन दिवस ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी फोन करून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली.

मुख्यमंत्री शिंदे सध्या सुटीसाठी त्यांच्या मूळगावी सातारा जिल्ह्यात दरे गावी आले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली. ऑपरेशन चांगलं झालं ना. लवकर बरे व्हा आणि लवकर या. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी डॉक्टरांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. लवकर बरे व्हा आणि लवकर या, अशी विनंतीवजा सूचनाही शहाजीबापू पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.