अहिल्यादेवी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन!

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे रोजी होणारी २९९ वी जयंती सालाबादप्रमाणे यंदाही सांगलीतील स्टेशन चौक येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येणार आहे. हा उत्सव सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आयोजित केला आहे, अशी माहिती विनायक रूपनर यांनी दिली. यावेळी विनायक रूपनर म्हणाले की, कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता शासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर होईल.

त्यानंतर सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, ज्यामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी सायंकाळी ५ वाजता शिवकालीन लेझीम खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा खेळ पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणार आहे आणि स्थानिक कलाकारांनी त्यात सहभाग घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.