लंडनचा व्हिसा तयार होता, पण शेवटच्या क्षणी निर्णय बदलला; सांगोल्याच्या तरुणाने जि.प. निवडणुकीसाठी बॅरिस्टर पदवीचा केला त्याग

जिथे आजची (Sangola News) तरुण पिढी करिअरच्या मागे धावत परदेशाचे व्हिसा मिळवण्यासाठी धडपडत आहे, तिथे सांगोल्याचा एक तरुण लंडनच्या ‘बॅरिस्टर’ पदवीचा मोह झटकून मायभूमीच्या मातीत परतला आहे.

सांगोला तालुक्यातील जवळा येथील २४ वर्षीय यशराजे दीपक साळुंखे यांनी लंडनला जाऊन उच्च शिक्षण घेण्याऐवजी, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ‘उमेदवारी’ अर्ज दाखल करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

यशराजे यांनी कायद्याचे (LLB) शिक्षण पूर्ण केले असून, पुढील अभ्यासासाठी ते लंडनला रवाना होणार होते. मात्र, झेडपी निवडणुकांचे बिगुल वाजले आणि जवळा गटातील ग्रामस्थांनी एका उच्चशिक्षित तरुणाने नेतृत्व करावे, असा आग्रह धरला. एका बाजूला लंडनची प्रतिष्ठित वकिली आणि दुसऱ्या बाजूला गावातील सामान्यांचे प्रश्न होते.

“बॅरिस्टर होऊन कोर्टात केस लढवण्यापेक्षा, माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्काची लढाई लढणे मला जास्त महत्त्वाचे वाटते,” असे त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना ठामपणे सांगितले.

यशराजे यांच्या रूपाने साळुंखे घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. दिवंगत आमदार काकासाहेब साळुंखे यांचा अनुभव आणि वडील माजी आमदार दीपक साळुंखे यांचे मार्गदर्शन अशा भक्कम पार्श्वभूमीवर यशराजे ‘सांगोला तालुका विकास आघाडी’च्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत.