सध्या अनेक भागात द्राक्ष बागायतदार यांची संख्या मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गालगत सांगोला हद्दीमध्ये व सांगली हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीसाठीचे शेड उभारले जात आहेत. या परिसरात बेदाणा निर्मितीसाठी पोषक कोरडे, चांगले वातावरण असल्याने येथे उत्कृष्ट प्रतीच्या बेदाण्याची निर्मिती होते.यंदा द्राक्षांना चांगला दर असल्याने बेदाणा उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.
सांगोला, कवठेमहाकाळ, मिरज, आटपाडी, खानापूरसह सोलापूर व सांगली जिल्ह्यातील बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यात आले आहेत. काही भागांतील द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीसाठी शेडचा उपयोग करतात. त्यामुळे स्थानिकांनाही येथे रोजगार निर्मिती होते. येथील बेदाण्यास मोठी मागणी असते. दरही चांगला मिळत असल्याने अनेक शेतकर्यांचा कल हा बेदाणा निर्मितीकडे असतो.
गतवर्षी सततच्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आपसूकच चालू वर्षी द्राक्ष उत्पादन घटते आहे. त्यामुळे यंदा द्राक्षास चांगला दर आला आहे. दरम्यान, येथे हिरव्या रंगाच्या बेदाणाच्या निर्मितीसाठी पोषक हवामान व चांगले वातावरणामुळे आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेदाणा निर्मितीचा व्यवसाय होतो. या भागातील कोरडे व उष्ण हवामान असल्याने येथे बेदाणा लवकर सुकतो व चांगला रंग येतो.
जानेवारी ते एप्रिल या काळात याठिकाणी लाखो टन बेदाणा निर्मिती होते. परंतु, येथे शीतगृहाची सुविधाच नसल्याने शेतकर्यांना बेदाणा साठवण करण्यासाठी सांगली, मिरज, तासगाव येथील स्टोअरेजमध्ये माल न्यावा लागतो. हे खर्चिक असल्याने शासनाने सवलतीत येथेच शीतगृहे उपलब्ध करावीत, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकरी करत आहेत.
