बियाणे, खते खरेदीला शेतकऱ्याची गर्दी……

कोल्हापूर जिल्ह्यात पेरण्यांनी जोर घेतला असतानाच आता खते आणि बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.जिल्ह्यात यावर्षी एक लाख ९६ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे.

तसेच, विविध कंपन्यांच्या बियाणे, तणनाशके, टॉनिक, कीटकनाशकासह रासायनिक खतांची मागणी वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांत पेरण्यांनी गती घेतली आहे. कागल, राधानगरी, करवीर तालुक्यातील पश्‍चिम भाग, गगनबावडा, शाहूवाडीसह

हातकणंगले तालुक्यातील काही भागात पेरण्या सुरू झाल्या आहेत. हातपेरणीसह बैलजोडी आणि छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने जोडलेल्या कुरीला प्राधान्य दिले जात आहे. चांगले व दर्जेदार बियाणे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह आहे. ज्या उसाची आधीच भरणी झाली आहे किंवा भरणी केली आहे, त्या ऊस लागणीमध्ये तणनाशक फवारणीसाठी लगबग सुरू आहे.

सध्या तणनाशकांसह इतर कीटकनाशकांच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, ज्या-ज्या ठिकाणी वळीव पावसाने दमदार हजेरी लावली आहे, त्याठिकाणी रासायनिक खतांची मागणी वाढली आहे.