विट्यातील बेनापूर तसेच खानापूरला कुस्तीची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या तालुकास्तरीय निवडी संस्थापक गणेश मानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाल्या. यामध्ये खानापूर तालुकाध्यक्षपदी लेंगरे येथील प्रशांत सावंत व आटपाडी तालुकाध्यक्षपदी खरसुंडी येथील राहुल गुरव यांची निवड झाली आहे, अशी माहिती सांगली जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड (बलवडी. खा) यांनी दिली.
या सर्व पदाधिकाऱ्यांना उद्या रविवारी (दि. २ जून) सांगली येथील सम्राट व्यायाम मंडळ येथे होणाऱ्या कार्यक्रमात कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते निवड पत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम होणार आहे. सिद्धेश्वर गायकवाड म्हणाले, कुस्ती मल्लविद्या संघटना कुस्तीच्या वाढीसाठी प्रयत्नशील असून प्रशांत सावंत व राहुल गुरव यांच्या निवडीने खानापूर व आटपाडी तालुक्यात संघटना जोमाने वाढेल.
प्रशांत सावंत व राहुल गुरव यांचे निवडीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. राहुल गुरव व प्रशांत सावंत यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागात कुस्ती वाढण्यास मदत होणार आहे. येथील नवोदित मल्लांना तसेच महिला मल्लांनाही त्याचा उपयोग होईल.