सुहास बाबर यांच्या भूमिकेबद्दल परिसरातून कौतुक!

लेंगरे ग्रामपंचायतीवर स्व. आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. भाऊंच्या पश्चात या गटाचे नेतृत्व सुहास बाबर करीत आहेत. विकासकामासाठी दिवंगत आमदार बाबर यांनी आयुष्यात कधीच तडजोड केली नाही. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सुहास बाबर काम करीत आहेत. सुहास बाबर हे आटपाडी दौऱ्यावर होते.

ते लेंगरेमार्गे जात असताना नागरिकांनी त्यांच्या कानावर अनेक तक्रारी घातल्या. पांढरी येथे जाणाऱ्या रस्त्यात पाणी साचत असल्याचे वारंवार तक्रार होत असताना ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने नागरिकांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्याशी संपर्क साधला.

बाबर यांनी याठिकाणी येत पाहणी केली आणि नागरिकांचे होणारे हाल बघताच बाबर यांचा पारा चढला. ग्रामपंचायतीला खडे बोल सुनावले. विकासकामाबाबत तडजोड होत असल्याच्या कारणाने आपल्या विचाराच्या ग्रामपंचायतीला बाबर यांनी घरचा आहेर दिला आहे.

लोकांची कामे करा, आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांना काही त्रास होता कामा नये, कामे करत असताना कोणताही गट-तट न मानता विकासकामे पूर्ण करावीत तसेच होणारी सर्व कामे गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट व्हावी व ठेकेदारांनी सर्व कामे करताना कामाची गुणवत्ता ठेवावी, अशा सक्त सूचना दिल्या. बाबर यांच्या चुकीला चूक म्हणण्याच्या भूमिकेबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. सुहास बाबर यांच्या या कृतीचे गावातील सर्वांनीच उत्स्फूर्तपणे स्वागत केले.